वस्त्र निर्यातीमध्ये वाढ, आणखी सुधारणा होण्याची शक्यता

वस्त्र निर्यातीमध्ये वाढ, आणखी सुधारणा होण्याची शक्यता नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या लॉकडाऊननंतर अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागली आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये देशातून झालेल्या वस्त्र प्रावरणांच्या निर्यातीमध्ये दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. या क्षेत्रामध्ये ज्या तेजीने घसरण झाली होती, त्याच प्रमाणात वाढ सुरू झाल्याचे दिसत आहे. भारतीय वस्त्रोद्योग संघटनेचे अध्यक्ष ए. शक्तिवेल यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षामध्ये प्रथमच भारतामधून होणाऱ्या वस्त्रांच्या निर्यातीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये वस्त्रांची निर्यात १० टक्क्यांनी वाढली आहे. चालू वर्षात एप्रिल महिन्यामध्ये वस्त्र निर्यातीमध्ये ९० टक्क्यांची भयानक घसरण झालेली होती. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यामध्ये १० टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे. सप्टेंबर महिन्यात देशामधून झालेली वस्त्र निर्यात ही १.२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. मागील वर्षाच्या सप्टेंबर महिन्यामध्ये १.०७९ अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. याचाच अर्थ यंदा यावर्षी त्यामध्ये १०.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च महिन्यामध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. सुमारे तीन महिने देशातील अनेक ठिकाणची उत्पादन प्रक्रिया जवळपास ठप्प झाली होती. त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये वस्त्रोद्योगाच्या निर्यातीमध्ये मोठी घट झालेली दिसून येत आहे. आगामी काळामध्ये भारतीय वस्त्रांना आणि तयार कपड्यांना मोठी मागणी वाढून निर्यातीमध्ये वाढ होण्याची शक्यता या क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. इंग्रजी वर्णमालेतील के या अक्षराप्रमाणे वस्त्र निर्यातीची स्थिती झाली आहे. प्रथम तीव्र घट आणि त्यानंतर त्याच वेगाने होणारी सुधारणा असे या अक्षराच्या परिस्थितीचे वर्णन केले जाते. सप्टेंबर महिन्यामध्ये झालेली वाढ ही तीव्र घसरणीनंतरची जोरदार वाढ दर्शवित आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये निर्यात आणखी वाढून हा उद्योग चांगली कामगिरी नोंदविण्याची अपेक्षा आहे. - ए. शक्तिवेल, अध्यक्ष, वस्त्रोद्योग निर्यात परिषद

Leave a Comment: